रत्नागिरी शहरातलं दु:स्वप्नं ...
शहर निर्माण होतं. वाढतं. पसरत जातं. पसारा वाढत जातो तसं नियंत्रण सुटत जातं. शहर स्वतःचा आखीवरेखीवपणा सोडून सुटू लागते. व्यवस्थांचा वाढणारा ताण शहराला हळूहळू पोखरू लागतो. शहर अनिष्ट गोष्टींच्या विळख्यात सापडते. कधी काळी सुखाने नांदणारे शिस्तबद्ध असलेले शहर गैरशिस्तीचे माहेरघर बनते.
आभासी विश्वाच्या आहारी
वास्तवात वाढणारे हे शहर अवास्तव दुनियेत जाऊन पोचते. त्याला आभासी स्वप्नांचा गलिच्छ विळखा कधी पडतो , ते त्याचे त्यालाच समजत नाही. शहर आभासी विश्वाच्या आहारी जाते आणि आभासी दुनियेचे एकेक कारनामे सुरू होतात. कर लो दुनिया मुठ्ठीमें म्हणत संगणक , लॅपटॉप ते मोबाईल क्रांतीच्या परमसुखाचा रेतीव बिंदू शहर गाठू लागते तेव्हा अनेक गुलाबी स्वप्नांची क्रांती होते ! मन मोहवून टाकणारी स्वप्नपूर्ती समोर दिसू लागते आणि अनेकांच्या गाडीचे ब्रेक्स फेल होऊ लागतात ! त्यांच्या मोबाईलवर येणारी मदमस्त दृष्ये जोरजोरात हलू लागतात , त-हेत-हेचे अंगविक्षेप करून तरूण जिवांची पार दैना उडवतात ! थोडी मज्जा वाटते . अजून थोडे, अजून थोडे...असे पुढे सरकत असतांनाच पायाखालची जमीन सरकली जाते. आभासी फोटो , व्हिडिओ आणि संभाषण यांनी पोरांचा बॅंक बॅलन्स सराईतपणे संपवलेला असतो. मग मुले आईवडिलांचा बॅंक बॅलन्स परस्पर रिता करु लागतात . याची जाणीव झाली की आपला मुलगा कसल्या गर्तेत सापडला आहे याची पालकांना कल्पना येऊन त्यांच्या डोळ्यासमोर भरदिवसा अंधार पसरतो. आता या हनी ट्रॅप मधून मुलाला बाहेर कसं काढायचं ? गेलेली इज्जत परत कशी मिळवायची ? अनभिज्ञ पालकांना आपलं मूल अशा काही जाळ्यात फसेल अशी पुसटशी कल्पनाही येत नाही. पण हे खरे आहे हे कळते तेव्हा त्यांना फार मोठा धक्का बसलेला असतो.
धक्क्यातून सावरणे सोपे नाही
धक्क्यातून सावरायला फार वेळ लागतो . मुलगा अनैतिक मार्गाला लागलेला असतो. पैसा गेलेला असतो. समाजात मानहानी झालेली असते. आभासी समाजमाध्यमांमधून याचा गैरफायदा घेत समाजकंटक तरूणींच्या टोळया तयार करतात. त्या तरूणींमार्फत तरूणांना ब्लॅकमेलींगच्या जाळ्यात ओढतात. दुसऱ्यांना दु:खं देऊन , त्यांचा पैसा हडप करतात . ईज्जत संपवतात. इतकं सारं जगात घडवणारा तो हनी ट्रॅप आता रत्नागिरीत थैमान घालू लागला आहे. आणखी एक शहर विळख्यात ओढलं जातंय. इथली तरूणाई उध्वस्त होऊ घातली आहे.
हनीट्रॅप रत्नागिरी बातमी स्त्रोत :
No comments:
Post a Comment