. My City Ratnagiri: 2022

Sunday, February 6, 2022

Honey trap for Ratnagiri youth

रत्नागिरी शहरातलं दु:स्वप्नं ...

शहर निर्माण होतं. वाढतं. पसरत जातं. पसारा वाढत जातो तसं नियंत्रण सुटत जातं. शहर स्वतःचा आखीवरेखीवपणा सोडून सुटू लागते.  व्यवस्थांचा वाढणारा ताण शहराला हळूहळू पोखरू लागतो. शहर अनिष्ट गोष्टींच्या विळख्यात सापडते. कधी काळी सुखाने नांदणारे शिस्तबद्ध असलेले शहर गैरशिस्तीचे माहेरघर बनते. 


आभासी विश्वाच्या आहारी 

वास्तवात वाढणारे हे शहर अवास्तव दुनियेत जाऊन पोचते. त्याला आभासी स्वप्नांचा गलिच्छ विळखा कधी पडतो , ते त्याचे त्यालाच समजत नाही. शहर आभासी विश्वाच्या आहारी जाते आणि आभासी दुनियेचे एकेक कारनामे सुरू होतात. कर लो दुनिया मुठ्ठीमें म्हणत संगणक , लॅपटॉप ते मोबाईल क्रांतीच्या परमसुखाचा रेतीव बिंदू शहर गाठू लागते तेव्हा अनेक गुलाबी स्वप्नांची क्रांती होते ! मन मोहवून टाकणारी स्वप्नपूर्ती समोर दिसू लागते आणि अनेकांच्या गाडीचे ब्रेक्स फेल होऊ लागतात ! त्यांच्या मोबाईलवर येणारी मदमस्त दृष्ये जोरजोरात हलू लागतात , त-हेत-हेचे अंगविक्षेप करून तरूण जिवांची पार दैना उडवतात !  थोडी मज्जा वाटते . अजून थोडे, अजून थोडे...असे पुढे सरकत असतांनाच पायाखालची जमीन सरकली जाते. आभासी फोटो , व्हिडिओ आणि संभाषण यांनी पोरांचा बॅंक बॅलन्स सराईतपणे संपवलेला असतो. मग मुले आईवडिलांचा बॅंक बॅलन्स परस्पर रिता करु लागतात . याची जाणीव झाली की आपला मुलगा कसल्या गर्तेत सापडला आहे याची पालकांना कल्पना येऊन त्यांच्या डोळ्यासमोर भरदिवसा अंधार पसरतो. आता या हनी ट्रॅप मधून मुलाला बाहेर कसं काढायचं ? गेलेली इज्जत परत कशी मिळवायची ? अनभिज्ञ पालकांना आपलं मूल अशा काही जाळ्यात फसेल अशी पुसटशी कल्पनाही येत नाही. पण हे खरे आहे हे कळते तेव्हा त्यांना फार मोठा धक्का बसलेला असतो. 


धक्क्यातून सावरणे सोपे नाही


धक्क्यातून सावरायला फार वेळ लागतो . मुलगा अनैतिक मार्गाला लागलेला असतो. पैसा गेलेला असतो. समाजात मानहानी झालेली असते. आभासी समाजमाध्यमांमधून याचा गैरफायदा घेत समाजकंटक तरूणींच्या टोळया तयार करतात. त्या तरूणींमार्फत तरूणांना ब्लॅकमेलींगच्या जाळ्यात ओढतात. दुसऱ्यांना दु:खं देऊन , त्यांचा पैसा हडप करतात . ईज्जत संपवतात. इतकं सारं जगात घडवणारा तो हनी ट्रॅप आता रत्नागिरीत थैमान घालू लागला आहे. आणखी एक शहर विळख्यात ओढलं जातंय. इथली तरूणाई उध्वस्त होऊ घातली आहे. 


हनीट्रॅप रत्नागिरी बातमी स्त्रोत

हनी ट्रॅप


Sunday, January 30, 2022

The man who brought first Rikshaw in Konkan

  31 जानेवारी - 


कोकणात पर्यायाने रत्नागिरी शहरात पहिली पॅसेंजर रिक्षा आणणारे विष्णू लक्ष्मण गोगटे यांचा वाढदिवस / जयंती - 


जन्म -  31 जानेवारी, 1937 .

मृत्यू - 17 डिसेंबर, 2020 .


विष्णू यांचा जन्म 31 जानेवारी, 1937 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे व माध्यमिक  शालेय शिक्षण रत्नागिरी येथे झाले. फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथून 1956 साली ते एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडिलांचे रत्नागिरी शहरातील गोखले नाका येथे ल. V. Gogate & Sons नावाने दुकान होते.  घरच्या व्यवसायात सन 1956 ते 1970 या काळात जात असत.  

त्याकाळी रत्नागिरीतील प्रवासी वाहतूक बैलांची सारवट, सायकल किंवा टॅक्सी मधून होत असे. 1970 च्या सुमारास वाघधरे  यांच्या गलबतातून त्यांना कालिकत येथे जाण्याची संधी मिळाली होती. कालिकत हे शहर रत्नागिरी शहरासारखेच. त्या परिसरात त्यावेळी रिक्षा व्यवसाय सुरू झाला होता. तिथूनच त्यांना त्यांच्या मनात असलेला रिक्षा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा मिळाली  व त्यांनी पॅसेंजर ऑटो रिक्षा परमिट असलेली आणण्याचे ठरवले. 

त्यांनी रिक्षा परमिट मिळवण्यासाठी अर्ज केला परंतु परमिट मिळवण्यासाठी त्यांना 2 - वर्षे सतत पाठपुरावा करावा लागला होता. याकामी राजाभाऊ लिमये यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

बजाज कंपनीची रिक्षा बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेऊन त्यांनी आणली होती. रत्नागिरी शहरात पहिली परमिट ऑटो रिक्षा आणण्याचा मान त्यांचाच. " वैशाली "हे त्यांच्या रिक्षाचे नाव. 7 फेब्रुवारी, 1972 रोजी लोकनेते शामराव पेजे यांच्या हस्ते उदघाटन करून त्यांनी रिक्षा व्यवसायाला प्रारंभ केला. शंकरराव पटवर्धन हे त्यांचे पहिले प्रवासी होत. 

रिक्षा व्यवसाय हे त्यांचे उपजीविकेचे साधन होते. सन 1998 पर्यंत ते रिक्षा व्यवसायात कार्यरत होते. रत्नागिरी रिक्षा संघटनेचे अनेक वर्षे ते पदाधिकारी होते. 

त्यानंतर तिलक नगर परिसरात गोगटे कम्युनिकेशन अँड जनरल स्टोअर्स नावाने काही वर्षे व्यवसाय केला होता. सन 2012 सालच्या मे महिन्यात 25 वर्षे विना अपघात रिक्षा चालवल्याबद्दल त्यांचा रत्नागिरी जिल्हा रस्ते सुरक्षा समिती व सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने तत्कालिन मा. जिल्हा न्यायाधीश विजय मुन्शी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. शालेय जीवनात पोहण्याची त्यांना विशेष आवड होती. याव्यतिरिक्त बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, खो -खो , कबड्डी इत्यादि मैदानी खेळातही त्यांचा सहभाग असायचा. 

रिक्षा व्यवसाय होताच असे असले तरी ते उत्तम बॅडमिंटन खेळाडूही होते. बरीच वर्षे ते बॅडमिंटन स्वतः जरी खेळत होते तरीही ते कोच म्हणूनही प्रसिद्ध होते. रत्नागिरी शहरातील अनेक बॅडमिंटनपटू त्यांनी तयार केले. अनेक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता व अनेक बक्षीसेही मिळवली होती.  

रत्नागिरी बॅडमिंटनमध्ये रत्नागिरीतील आणखीन एक बॅडमिंटनपटू कै. डॉ. मु. न. पानवलकर यांच्यासोबत बॅडमिंटन डबल्सच्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. रत्नागिरी शहरातील ही बॅडमिंटनमधली अभेद्य जोडी मानली जात होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर 45 वर्षांवरील वयोगटातील डबल्सचे उपविजेतेपद या जोडीने मिळवले होते. 

याव्यतिरिक्त अहमदनगर व  पुणे येथे सन 1982, 1984,1987,1992,1997 मध्ये खेळल्या गेलेल्या ओल्ड मॉंक्स व्हेट्रन बॅडमिंटन स्पर्धेत पाच वेळा ही जोडी विजयी ठरली होती.

1 ऑगस्ट, 2019 रोजी सर्वंकष विद्यामंदीरच्या बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन गोगटे- पानवलकर या जोडीच्या हस्ते झाले होते. 


17 डिसेंबर, 2020 रोजी वृद्धापकाळाने त्यांना देवाज्ञा झाली. 


अशा या विविधांगी  व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन . 


माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. 

माहिती नावासह Like & Share करण्यास हरकत नाही.

Tuesday, January 25, 2022

अरबी समुद्रात वादळ

 गेले काही दिवस मुंबईसह सर्व कोंकणात धुळीचे वादळ सुरु होतेच. त्यात आता नजिकच्या अरबी समुद्रात वादळी वारे सुरू झाले आहेत. थंडीचा कहर सुरू असतांनाच कोंकणात ऐन जानेवारीत पाऊसही अधूनमधून हजेरी लावतोय. एकीकडे आंब्यांच्या झाडांना मोहोर फुटत असतांनाच कोंकणात ह्या विचित्र नैसर्गिक घडामोडी घडत आहेत, हे विशेष. किमान गेल्या साठ वर्षांत कोंकणात असले काही घडले नव्हते. पण आता सातत्याने येणारी वादळे , त्यातही अरबी समुद्रात वाहते जोरदार वारे ज्यामुळे पुन्हा समुद्रात वादळे निर्माण होत आहेत. खालील लिंक वरून आपल्याला सद्य स्थितीत कोंकणात काय घडत आहे वा घडू घातले आहे याची ताजी कल्पना येईलच. संबंधित बातमीकारांचे बातमीबद्दल धन्यवाद. 

अरबी समुद्रात वादळी वारे