31 जानेवारी -
कोकणात पर्यायाने रत्नागिरी शहरात पहिली पॅसेंजर रिक्षा आणणारे विष्णू लक्ष्मण गोगटे यांचा वाढदिवस / जयंती -
जन्म - 31 जानेवारी, 1937 .
मृत्यू - 17 डिसेंबर, 2020 .
विष्णू यांचा जन्म 31 जानेवारी, 1937 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे व माध्यमिक शालेय शिक्षण रत्नागिरी येथे झाले. फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथून 1956 साली ते एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडिलांचे रत्नागिरी शहरातील गोखले नाका येथे ल. V. Gogate & Sons नावाने दुकान होते. घरच्या व्यवसायात सन 1956 ते 1970 या काळात जात असत.
त्याकाळी रत्नागिरीतील प्रवासी वाहतूक बैलांची सारवट, सायकल किंवा टॅक्सी मधून होत असे. 1970 च्या सुमारास वाघधरे यांच्या गलबतातून त्यांना कालिकत येथे जाण्याची संधी मिळाली होती. कालिकत हे शहर रत्नागिरी शहरासारखेच. त्या परिसरात त्यावेळी रिक्षा व्यवसाय सुरू झाला होता. तिथूनच त्यांना त्यांच्या मनात असलेला रिक्षा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा मिळाली व त्यांनी पॅसेंजर ऑटो रिक्षा परमिट असलेली आणण्याचे ठरवले.
त्यांनी रिक्षा परमिट मिळवण्यासाठी अर्ज केला परंतु परमिट मिळवण्यासाठी त्यांना 2 - वर्षे सतत पाठपुरावा करावा लागला होता. याकामी राजाभाऊ लिमये यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
बजाज कंपनीची रिक्षा बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेऊन त्यांनी आणली होती. रत्नागिरी शहरात पहिली परमिट ऑटो रिक्षा आणण्याचा मान त्यांचाच. " वैशाली "हे त्यांच्या रिक्षाचे नाव. 7 फेब्रुवारी, 1972 रोजी लोकनेते शामराव पेजे यांच्या हस्ते उदघाटन करून त्यांनी रिक्षा व्यवसायाला प्रारंभ केला. शंकरराव पटवर्धन हे त्यांचे पहिले प्रवासी होत.
रिक्षा व्यवसाय हे त्यांचे उपजीविकेचे साधन होते. सन 1998 पर्यंत ते रिक्षा व्यवसायात कार्यरत होते. रत्नागिरी रिक्षा संघटनेचे अनेक वर्षे ते पदाधिकारी होते.
त्यानंतर तिलक नगर परिसरात गोगटे कम्युनिकेशन अँड जनरल स्टोअर्स नावाने काही वर्षे व्यवसाय केला होता. सन 2012 सालच्या मे महिन्यात 25 वर्षे विना अपघात रिक्षा चालवल्याबद्दल त्यांचा रत्नागिरी जिल्हा रस्ते सुरक्षा समिती व सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने तत्कालिन मा. जिल्हा न्यायाधीश विजय मुन्शी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. शालेय जीवनात पोहण्याची त्यांना विशेष आवड होती. याव्यतिरिक्त बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, खो -खो , कबड्डी इत्यादि मैदानी खेळातही त्यांचा सहभाग असायचा.
रिक्षा व्यवसाय होताच असे असले तरी ते उत्तम बॅडमिंटन खेळाडूही होते. बरीच वर्षे ते बॅडमिंटन स्वतः जरी खेळत होते तरीही ते कोच म्हणूनही प्रसिद्ध होते. रत्नागिरी शहरातील अनेक बॅडमिंटनपटू त्यांनी तयार केले. अनेक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता व अनेक बक्षीसेही मिळवली होती.
रत्नागिरी बॅडमिंटनमध्ये रत्नागिरीतील आणखीन एक बॅडमिंटनपटू कै. डॉ. मु. न. पानवलकर यांच्यासोबत बॅडमिंटन डबल्सच्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. रत्नागिरी शहरातील ही बॅडमिंटनमधली अभेद्य जोडी मानली जात होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर 45 वर्षांवरील वयोगटातील डबल्सचे उपविजेतेपद या जोडीने मिळवले होते.
याव्यतिरिक्त अहमदनगर व पुणे येथे सन 1982, 1984,1987,1992,1997 मध्ये खेळल्या गेलेल्या ओल्ड मॉंक्स व्हेट्रन बॅडमिंटन स्पर्धेत पाच वेळा ही जोडी विजयी ठरली होती.
1 ऑगस्ट, 2019 रोजी सर्वंकष विद्यामंदीरच्या बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन गोगटे- पानवलकर या जोडीच्या हस्ते झाले होते.
17 डिसेंबर, 2020 रोजी वृद्धापकाळाने त्यांना देवाज्ञा झाली.
अशा या विविधांगी व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन .
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती नावासह Like & Share करण्यास हरकत नाही.